पर्युत्सुक

Published on May 1st, 2015 | by Sandeep Patil

2

व्यर्थ (न हो) बलिदान

आज महाराष्ट्र दिनासारखा महत्वाचा दिवस …. अशा प्रसंगी महाराष्ट्राचं कौतुक सांगावं असं कितीकाही आहे. तरीदेखील मी लिहिण्यासाठी अशा प्रसंगाला अप्रस्तुत विषय निवडला आहे. कारण घराला तोरण बांधण्याआधी किंवा दारात रांगोळी मांडण्याआधी घर साफसूफ करण महत्वाचं! तसंच इथे डोळ्यादेखत कीड लागली असताना, उगीचच साखरपेरणी करण्यात अर्थ नाही. त्या कामासाठी रोज सकाळ ची वर्तमानपत्रे आहेतच. राज्यकर्त्यांच्या हातात गेल्यापासून नाहीतरी निर्भीड इत्यादी वर्तमानपत्रांचे तेवढेच काम राहिले आहे – एकतर रोज समाजाला आपल्या शहराच्या-राज्याच्या प्रगतीची अंगाईगीते गाऊन झोपवून ठेवणे, आणि दुसरे विरोधाकांच्यावर खर्या-खोट्याचे बेमालूम मिश्रण करीत आरोप ठेवणे आणि स्वत: च्या सोयीनुसार समाजाची दिशाभूल करणे. त्यामुळे कौतुकाचे पोवाडे गाण्यापेक्षा, थोडा कडू विषय निवडला.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची आजवरची पुण्याई पणाला लागावी अशा एका पेक्षा एक घटना घडत गेल्या – अजूनही घडताहेत. पण आपल्यासारखे अभागी आपणच – कारण मूळ घटनेबद्दल शोक करावा तोवर तत्पश्चात येणाऱ्या प्रतिक्रिया , घडणारा घटनाक्रम या आपल्याला अजूनच शरमिंदा करतात.

शेतकर्यांच्या आत्महत्यांची आपण एव्हाना सवय लावून घेतली आहे. गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात फ़क़्त एक टक्का ( १ % ) जमीन ओलिताखाली आली – म्हणजे, दुसऱ्या शब्दात एका वर्षात एका हजारात फ़क़्त एकाला प्यायला पाणी मिळाले!!! पण आपल्याला सिंचन घोटाळयासारख्या गौण गोष्टींवर लक्ष द्यायला फुरसत नव्हती. जिथे “वारणानगर” सारखी आधुनिक वसाहत (देशातील पहिले Wide Area Network) निव्वळ सहकाराच्या माध्यमातून उभी राहिली, ती सहकार चळवळच मोडीत निघाली. जेंव्हा आपल्याला “सुपरमार्केट” हा शब्द माहितीदेखील नव्हता तेंव्हा आशियातील सर्वात मोठं सुपरमार्केट कोल्हापूर सारख्या छोट्याश्या, समृद्ध शहरात केवळ सहकारी तत्त्वातून उभं राहिलं होतं; पुढे तेच सुपरमार्केट बंद पडताना आपण स्वस्थपणे बघत राहिलो आणि लवकरच आपल्या भागात नव्याने सुरु झालेल्या मॉल मध्ये शॉपिंग करायला मोकळे झालो. सोलापुरी चादरी दिमाखाने मिरवणाऱ्या सूतगिरण्या बंद पडल्या आणि आपण अर्धवट उघड्या डोळ्यांनी बहुतेक वेळ अमेरिकेत वास्तव्यकरणाऱ्या आमदारपुत्राला निवडून दिले व कूस बदलून झोपी गेलो. पुण्याची जमीन शिवाजीराजांनी ज्या दादोजींच्या सोबत सोन्याच्या नांगराने नांगरली, मुरार जगदेव ने दहशत बसवण्याकरता मारलेली पहार उखडून काढली … त्याच पुण्यात, त्याच दादोजींचा पुतळा आपण उखडून काढला आणि जगाच्या इतिहासात पुण्याची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंच झाली. लोकशाहीच्या मंदिरात (विधानसभेत) लोकनियुक्त प्रतिनिधींनी (आमदारांनी) लोकांच्याच रक्षकाला (एका पोलीस निरीक्षकाला) घेरून लाथाबुक्याने मारले, तेंव्हा आपण टीव्ही वर IPL च्या चीअरलीडर्स वर भाळलो होतो. साधारण पेशवाईच्या अखेरची, दुसऱ्या बाजीरावाची आमदनी आठवावी असा हा समय…

पण या सर्व घटनांवर देखील वरताण करणारी घटना या काळात महाराष्ट्रात घडली – ते पण एक नव्हे दोन – पहिली डॉ नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात झालेली हत्या आणि नंतर कॉ गोविंद पानसरेंची त्याच पद्धतीने कोल्हापुरात झालेली हत्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत घोंगावणारे राजकारणी आणि पेज-थ्री वाले समाजकारणी, हाता-गळ्यात चेन अंगठ्या घालून वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड चौकात लावणारे भाऊ, दादा, अण्णा या सगळ्यांच्या भाऊगर्दीतून … नेमके दोन सच्चे, प्रामाणिक, वयस्क, राजकीय पाठबळ नसलेले आणि तुमच्याआमच्या सारखे मध्यमवर्गीय असे कार्यकर्ते दिवसाढवळ्या बंदुकीने टिपले जातात … टिपले जातात म्हणजे काय, हौशी शिकार्याने नेमबाजीचा सराव करताना जशा झाडाला लटकवलेल्या कलिंगडाच्या चिंधड्या उडवाव्या, तशा त्यांच्या कवटीच्या ठिकऱ्या उडवल्या जातात… हल्लेखोर पसार होतात… आणि दाउद इब्राहिम ला कराची मधून पकडून आणू पाहणारे आपले पोलीस खाते हात चोळत बसते.

मी स्वतः कोल्हापूरचा असल्याने कै. पानसरेंचे कार्य मी लहानपणापासून बघत आलो आहे. श्रेय घेण्यासाठी सोकावलेल्या आणि श्रेय घेण्यासाठीच राजकारण करणाऱ्या जमातीमध्ये कोणी व्रतस्थपणे, निस्वार्थीपणे काम करणारे सद्गुणी कार्यकर्ते असू शकतात यावर एरव्ही माझा विश्वास बसला नसता. पण या संदर्भात पण एक गणित मला आजवर समजल नाही – पानसरेच्या मृत्यूनंतर सगळं कोल्हापूर हळहळलं, ज्याच्या त्याच्या तोंडी दुसरा विषय नव्हता. पण पानसरे हयात असताना त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या, पण ते विशेषकरून कुठल्या निवडणुकीत विजयी झालेले मला तरी आठवत नाहीत. एरव्ही रोज दुपारच्या जेवणाबरोबर राजकारणी मंडळीना शिव्या देणारे लोक, ऐन निवडणुकांच्या वेळी पानसरेनसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नेमके भ्रष्ट राजकारण्यानाच कसे मत देतात समजत नाही. आज कोल्हापुरातून राजू शेट्टी, किंवा हैद्राबाद मध्ये डॉ जयप्रकाश नारायण यांसारखे प्रामाणिक लोकनेते आहेत, पण गेल्या १०-१० वर्षांत ते आपल्या पक्षाचा विशेष प्रसार करू शकले नाहीत. असे निष्ठावंत लोक मग स्वत:च्या तत्वाशी काडीमोड घेऊन राजकारण्यांच्या कळपात घुसण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात, पर्यायाने त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. आणि असे लोक मग एकटे दुकटे टिपून शिकार करायला सोपे!

पण आपलं दुर्दैव एवढ्यावर संपत नाही. पानसरे किंवा दाभोलकर यांसारख्यांनी आपल्या प्राणाचा बळी देऊन पण भागात नाही. आपल्याकडे वाहत्या पाण्यात हात धुवून घेणारे कमी नाहीत. आता अनायासे मेलेच आहेत तर जमलाच तर त्यावरून विरोधकांना दोन-चार तडाखे देवूच असा विचार करून प्रचार करणारे उचापतखोर असतातच.

दाभोलकरांच्या हत्येनंतर असा प्रवाद निघाला कि दाभोळकर ज्या अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचे पाठीराखे होते, तो कायदा अस्तित्वात आला तर जातीय वर्चस्ववादाला शह बसणार होता (कसा ते माहित नाही – अंधश्रद्धा या सर्व जातीधर्मात आहेतच) – म्हणून त्यांची हत्या घडवून आणली. पण वास्तवात जो अंधश्रद्धा निर्मुलन कायदा दाभोलकरांना आयुष्यभर हुलकावण्या देत राहिला, तो शेवटी त्यांच्या मृत्यू ने साध्य झाला!!! मग हा मुद्दा तर्कात कुठे बसतो?

तीच गोष्ट पानसरेंची! पानसारेंच्या हत्येनंतर मी वृत्तपत्रातून (इंटर्नेटवर) बरेच लेख वाचले. बहुतेकांना पानसरे विशेष करून माहिती नसावेत. अनेकांचा सूर असा होता की पानसरेनी आपल्या “शिवाजी कोण होता” या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे निधर्मी स्वरूप जगासमोर आणले जे हिंदुत्ववाद्यांना सहन झाले नाही. हे एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारण दिले आहे. “शिवाजी कोण होता ” हे पुस्तक माझ्या संग्रही आहे, उण्यापुऱ्या ७० पानांचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन २५ एक वर्षे झाली – पण या सगळ्या गोष्टी अंधारात ठेवून तज्ञांनी स्वत:चे विवेचन (!) केले आहे. शिवाय महाराजांची धर्मविषयक भूमिका अशा प्रकारे मांडणारे पानसरे हे पहिले लेखक नव्हेत – महाराजांच्या धर्मविषयक भूमिकेचे हे स्वरूप महाराष्ट्रात सर्वमान्य आहे … अगदी मी ५ वी – ६ वी ला असताना पण इतिहासाच्या पुस्तकात अशाच अर्थाची वाक्ये होती. (शिवाजी महाराज सर्व धर्मांचा मान ठेवीत, त्यांच्या सैन्यात मुसलमान लोक देखील होते, त्यांच्या पदरी सिद्दी हिलाल, दौलतखान असे सरदार होते. इ. इ.)

अर्थात मी एक-दोन मुद्दे इथे उदाहरणादाखल दिले आहेत. महत्वाचा मुद्दा हा आहे की आयुष्यभर जे लोक स्वत:च्या आदर्शासाठी जगतात, त्याच साठी मारतात , त्यांच्या मृत्यूबद्दल देखील लोकांची दिशाभूल करून साधणारे काय साधतात. स्वत:चे व्यक्तिगत स्वार्थ , मते, अट्टाहास हे दुसर्याच्या हौतात्म्यापेक्षा देखील महत्वाचे असतात का?

या सर्व कोलाहलात त्यांचा कार्यभाग साधतो ज्यांनी हे कारस्थान घडवून आणले. ज्याप्रमाणे जादुगार लोकांचे लक्ष एका बाजूला वेधतो आणि दुसऱ्या बाजूला हातचलाखी साधतो, तद्वत लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधून खरे मारेकरी गुंत्यातून निसटत जातात.

मी ‘रंग दे बसंती’ चित्रपट पहिला होता तेंव्हा त्यातल्या अनेक ढोबळ चुका वजा जाता देखील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती, खटकली होती … ती म्हणजे ज्या देशभक्तांनी देहदंड सोसून, उपोषण करून, प्राणत्याग करून पुढच्या पिढीला स्वातंत्र्यसूर्य दाखवला , त्यांना पुढच्या पिढीने बदल्यात काय दिले? क्रांतीकारकांना जर आजच्या भारताचं जस्सच्या तस्स चित्र तेंव्हा कुणी जादुई काचेच्या गोलातून दाखवलं असत तर त्यांची एवढा त्रास सोसायची तयारी झाली असती काय? आज दाभोलकर-पानसरेच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जे काही घडत आहे, ते पाहून तोच प्रश्न पुन्हा एकदा पडत आहे.

श्रद्धांजली!

Tags: ,


About the Author

God knows why but I have too many interests. So chances are that you and me have something in common. Let’s see… Patanjali? Chanakya? Romans? Vijaynagar? Shivaji? Renaissance? Vivekanand? Agatha Christie? Tagore? Hitchcock? S.D.Burman? Cary Grant? Satyajit Ray? Grace Kelly? Brucia la terra? Suchitra Sen? Roman Holiday? Vasantaro Deshpande? Robert de Niro? Malguena? Kishore Kumar? Osho? Hotel California? Smita Patil? Erich von Daniken? Pu La? GA? Andaz Apna Apna? Asha Bhosale? PVN Rao? … Watch this space, sooner or later you will something on similar topic



2 Responses to व्यर्थ (न हो) बलिदान

Your comment / आपली प्रतिक्रिया

Back to Top ↑