पर्युत्सुक

Published on July 23rd, 2014 | by Sandeep Patil

5

मार्से आणि सावरकर

मार्से (Marseilles) हे फ्रांस मधील एक महत्वाचे शहर आहे हे ऐकून होतो,  पण ते एक खूप चांगलं पर्यटनस्थळ आहे हे मात्र माहित नव्हतं. या वर्षी दक्षिण फ्रांस ची सहल करायची ठरली, आणि या सहलीची सुरुवात मार्से पासून करणे सोयीचे जाणार होते, तेंव्हा जात आहोत तर मार्से पण पाहून घेऊ असा विचार केला. मार्से चे नाव अधून मधून या न त्या कारणाने कानावर पडायचे. एकतर फ्रांस च्या राष्ट्रगीताचे बोलच ‘ले मार्से…’ असे आहेत, त्या अर्थी फ्रांस च्या इतिहासात मार्से चे स्थान खूप महत्वाचे असणार यात शंका नाही. पण यापेक्षा मला मार्से माहिती होते ते तीन जबरदस्त रोमांचक कथांच्या संदर्भात. पहिली रोबर्ट लुडलम ने अजरामर केलेला, स्वत:चा भूतकाळ विसरलेला हिरो ‘जेसन बौर्न’, त्याची कादंबरीमाला. याच्यावर बनवलेले चित्रपट देखील तितकेच गाजले. हे पूर्ण ‘बौर्न प्रकरण’ सुरु होते मार्से पासून. दुसरी दीड-पावणेदोनशे वर्षांपूर्वी लिहिलेली कादंबरी जी अजूनसुद्धा आवडीने वाचली जाते अशी ‘द कौंट ऑफ मोन्ते-ख्रिस्तो’. मार्से च्या समुद्रात थोड्या अंतरावर एका छोट्याश्या बेटावर एक जुना किल्लावजा तुरुंग आहे, “शॅटू दे इफ” (Château de If) नावाचा – या कादंबरीने तो जगभर प्रसिद्ध केला. आणि तिसरी कथा आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अचाट साहसाची – जहाजातून समुद्रात उडी मारून त्यांनी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळायचा प्रयत्न केला होता तो देखील या मार्से च्या बंदरात! या पैकी पहिल्या दोन कथा काल्पनिक, तर तिसरी सत्यकथा – पण म्हणून रोमांचकारीतेच्या बाबतीत पहिल्या दोन्हीपेक्षा जरा देखील कमी नाही, उलट मनाला जास्त भिडणारी. मार्से च्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ही कथा पुन्हा आठवली.

Dhingra

मदनलाल धिंग्रा

वि. दा. सावरकर

kanhere

अनंत कान्हेरे

विनायक दामोदर सावरकर, ही केवढी स्फोटक गोष्ट आहे हे सर्वात आधी इंग्रज सरकार ने ओळखलं होतं. ऐन पंचविशीत सावरकर बॅरीस्टरीच्या अभ्यासासाठी लंडनला आले, आणि थोड्याच दिवसांत परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्याची आकांक्षा करणाऱ्या, त्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या तरुणांचे केंद्रस्थान बनले. पुढे नाशिक मध्ये अनंत कान्हेरेनी जेक्सन साहेबाची हत्या केली, तर इकडे मदनलाल धिंग्रा नि लंडन मधेच कर्झन वायली ला गोळ्या झाडून ठार मारले. या दोघांचेही स्फूर्तीस्थान सावरकर होते. इतके दिवस भारतामधे कार्यरत असलेले क्रांतिकारी आता इंग्लंड पर्यंत येऊन पोहोचले आहेत नव्हे, त्यांचा नेता हा इथे लंडन मधे राहूनच सगळी सूत्रे हलवत आहे हे पाहून इंग्रज सरकार सटपटून गेले. आता काहीही करून सावरकरांना अटक करणे भाग होते, पण त्यांच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नव्हता. अर्थात, इंग्रज एरव्ही निती-नियमांच्या किती जरी गप्पा मारत असले, तरी वेळप्रसंग पाहून ते सगळे नियम धाब्यावर बसवायला मागेपुढे पहात नसत. एव्हाना सावरकर फ्रांस ला निघून गेले होते. त्यांना परत लंडन ला येण्यास भाग पाडण्यासाठी इंग्रजांचे प्रयत्न सुरु झाले, एवढे की भारतात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचा आणि नातेवाईकांचा छळ सुरु झाला. नाईलाजास्तव सावरकरांना लंडन ला परत येणे आणि पोलिसांच्या स्वाधीन होणे भाग पडले. तुटपुंज्या पुराव्यानिशी सरकार ने सावरकरांवर खटला दाखल केला, आणि त्यांना शिक्षा झाली ती काळ्या पाण्याची… तब्बल ५० वर्षे. ज्या शिक्षेपुढे निर्ढावलेले कैदी सुद्धा टिकत नसत, जिच्या यातनांना कंटाळून महिन्याला एखाद-दुसरा कैदी  आत्महत्या करत असे, अशी शिक्षा सावरकरांना ५० वर्षे भोगायची होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी शिक्षा यापूर्वी वा यानंतर कुणालाही दिली गेली नव्हती!

सगळंच संपल्यासारख झालं होतं. यावर एकच उपाय होता, काहीही करून इंग्रजांच्या कैदेतून पळून जाणे. त्या दृष्टीने त्यांना एकच संधी मिळणार होती. सावरकरांच्या वर भारतात देखील काही खटले दाखल केले होते, त्यांच्या कामकाजासाठी त्यांना बोटीने भारतात हलवण्यात येणार होतं. या जलप्रवासातच सुटका करून घ्यायची काही शक्यता होती. सावरकरांनी ही संधी सोडायची नाही असं ठरवलं. लवकरच त्यांना घेऊन पोलीस लंडनहून बोटीने निघाले…. इथून पुढे सुरु होते मार्से प्रकरण.

त्या काळी इंग्लंडहून भारतात येणाऱ्या बोटी या हमखास मार्से बंदरात थांबत. तेंव्हा मार्से मधेच स्वत:ची सुटका करून घेण्याचे सावरकरांनी ठरवले. तशा अर्थाचा सांकेतिक संदेश देखील त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. बोटीतून पळून जायचा एकच मार्ग होता, तिथल्या शौचकुपाला एक लहान खिडकी होती, जी नेहमी अर्धी उघडी ठेवलेली असे. सावरकरांची शरीरयष्टी किरकोळ होती, त्यामुळे त्यांना या खिडकीतून बाहेर पडणं शक्य झालं असतं. सर्व काही जुळून आलं होतं, पण इथून पुढे प्रत्येक बाबतीत नशीब आडवं येत गेलं. पळून जाण्यासाठी अंधार चांगला, पण तो होता जुलै चा महिना. सूर्य सकाळी ४-४.३० लाच उजाडलेला असे. सावरकर सकाळी ६ च्या सुमारास उठले, आणि त्यांनी पहारेकऱ्याला सांगितलं कि त्यांना शौचाला जायचं आहे. पण तो झोपेत होता, त्यांने उलट सावरकरांनाच थांबण्यास सांगितले. परत १५ मिनिटांनी सावरकरांनी त्याला उठवले, तेंव्हा कुठे त्याने दार उघडून सावरकरांना शौचालयाच्या दिशेने नेले. एव्हाना लक्ख उजाडले होते. आत जाताच सावरकरांनी दाराला कडी लावून घेतली आणि खिडकी पूर्ण उघडली. त्या छोट्याश्या खिडकीतून कसे-बसे आपले शरीर त्यांनी ढकलले, आणि बाहेर येताच त्यांनी थेट समुद्रात उडी घेतली. उडीचा आवाज ऐकून पहारेकरी धावत डेकवर आले, तर त्यांना किनार्याच्या दिशेने वेगाने पाणी कापत जाणारे सावरकर दिसले. त्यांना शिव्याशाप देत बोटीमध्ये बसून पोलीस त्यांचा पाठलाग करू लागले. एव्हाना सावरकर काठावर पोहोचले होते, पण समोर ९-१० फुट उंच भिंत आवासून उभी होती. आधीच पोहून दमलेल्या सावरकरांना ती भिंत लांघून जाणे भाग होते. ती भिंत चढताना २-३ वेळा ते निम्यातून खाली घसरले, शेवटी कशीबशी एकदाची ती भिंत त्यांनी पार केली आणि ते बंदराच्या दिशेने पळू लागले. बंदरात त्यांना न्यायला त्यांचे सहकारी येणार होते, पण इथे तर कोणीच दिसेनात. आता एकाच उपाय होता, ते म्हणजे फ्रेंच पोलिसांच्या स्वाधीन होणे. मार्से हा फ्रांस चा भूभाग असल्यामुळे, तिथे सावरकरांना अटक करण्याचा अधिकार ब्रिटीश पोलिसांना नव्हता. फ्रेंच पोलिसांच्या ताब्यात गेल्यामुळे आपोआपच ब्रिटीश पोलिसांपासून तात्पुरती का होईना सुटका होणार होती. सुदैवाने त्यांना जवळच एक फ्रेंच पोलीस दिसला. त्याच्या जवळ जाऊन ‘मला अटक कर आणि तुझ्या वरिष्ठांकडे घेऊन चल’ असे सावरकर त्याला मोडक्या-तोडक्या फ्रेंचमधे सांगू लागले. त्याला काहीच अर्थबोध होईना, भाषा आडवी आली. एव्हाना पाठलागावर असलेले ब्रिटीश पोलीस जवळ आले होते, त्यांनी प्राप्त परिस्थितीत सर्वात व्यावहारिक – अगदी ब्रिटिशांना साजेसा – असा मार्ग निवडला. त्यांनी त्या फ्रेंच पोलिसाला थोडी लाच दिली, आणि सावरकरांना आपल्या ताब्यात घेतले. त्या फ्रेंच पोलिसाला बसल्या जागी पैसे चालून आले होते, शिवाय अचानक उपटलेली ही सावरकरांची ब्याद पण वरच्यावर टळत होती. त्याने ब्रिटीश पोलिसांना सावरकरांना घेऊन बोटीवर जाऊ दिले. थोड्याच वेळात सावरकरांना नेण्यासाठी मोटार घेऊन त्यांचे सहकारी बंदरात येऊन पोहोचले, पण एव्हाना वेळ निघून गेली होती. पक्षी परत पिंजऱ्यात अडकला होता!

अशी ही सावरकरांची शोकांतिका! काही छुल्लक कारणांमुळे फसलेला प्रयत्न. जर सावरकर पळत पळत मार्से च्या गल्लीबोळातून निसटून गेले असते तर… किंवा जर त्या फ्रेंच पोलिसाने सावरकरांना परत ब्रिटीशांच्या ताब्यात द्यायला नकार दिला असता तर… किंवा जर सावरकरांचे सहकारी तिथे वेळेत पोहोचले असते तर… तर कदाचित भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास खूप वेगळा झाला असता. पण शेवटी वरवर छुल्लक वाटणाऱ्या घटनाच इतिहासाला कलाटणी देतात, आणि म्हणूनच त्या मनात घर करून राहतात!!

मार्से ला जायचं निश्चित झाल्यावर, मी या सावरकर प्रकरणाच्या काही खाणाखुणा मार्से मध्ये मिळतात काय याचा शोध घेऊ लागलो. इंटरनेटवर शोध घेतल्यावर समजलं की कोणे एके काळी आपल्या सरकारने मार्से मधे सावरकरांचं स्मारक बनवण्याची फ्रांसला विनंती केली आहे, आणि ती अजूनही फ्रेंच सरकारच्या विचाराधीन आहे. अर्थ स्पष्ट होता, सध्यातरी सावरकरांचं स्मारक किंवा तत्सम काही मार्से मध्ये नाही. दुसरा पर्याय होता, तो म्हणजे मार्से ला पोहोचल्यावर तिथल्या टुरिझम ऑफिस मध्ये चौकशी करणे. पण हा अगदीच कुचकामी उपाय होता. मार्से मधील लोकांना एका शंभर वर्षांपूर्वीच्या भारतीय स्वातंत्र्यवीराविषयी आस्था असण्याचं काहीच कारण नव्हतं (इथे बऱ्याच भारतीयांनाच मुदलात सावरकर माहिती नाहीत). शिवाय अशी माहिती खोदून काढण्यासाठी भाषेची पण अडचण होती. एकंदरीत असं दिसू लागलं की मी मार्से ला जाऊन तर येणार, पण परत आल्यावर देखील एकूण सावरकर प्रकरणाविषयी तेवढाच अनभिज्ञ राहणार. एखादं भव्य तैलचित्र बघायला दालनात प्रवेश करावा, त्याच वेळी लाईट जाऊन अंधार व्हावा आणि आपल्याला तसंच चित्र न बघता बाहेर यायला लागावं असं काहीसं झालं.

एखाद्या गोष्टीविषयी माहिती मिळणं बंद झालं, की त्याविषयीचं कुतूहल अजून वाढतं. गूढ वाढलं कि आकर्षण पण वाढत. तेच सावरकरांच्या कथेबाबत झालं.

notre-dame-marseilles

नोत्र-दाम दे ला गार्ड

शेवटी तसाच कोरी पाटी घेऊन मार्से ला पोहोचलो. मार्से ही वैविध्याने भरलेली नगरी आहे. एकतर बंदर आणि शिवाय प्राचीन इतिहास यामुळे तिथे वेगवेगळ्या देशांचा आणि संस्कृतींचा प्रभाव दिसतो. बघण्यासारखं पण बरंच काही – जुनी चर्चेस आहेत, म्युझियम्स आहेत, बीच आहेत. पण हे सगळं पहात असताना राहून राहून सावरकर आठवू लागले. ज्या रस्त्यांतून आपण आता राजरोसपणे फिरत आहोत, त्याच रस्त्यात आपल्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ, दिव्य, त्यागी असा जाज्वल्य देशभक्त एखाद्या भुरट्या चोराप्रमाणे धावला असेल, त्याला इंग्रज शिपायांनी एखाद्या गुरासारख टाचा घासत ओढून नेलं असेल, असे विचार मनाला अस्वस्थ करू लागले. शेवटी यालाच भाग्य म्हणतात. कुणाच्या वाट्याला कसं येईल, तर कुणाच्या कसं!

नोत्र-दाम – अंतर्गृह

एके दिवशी सकाळी आम्ही मार्से चे सुप्रसिद्ध चर्च ‘नोत्र-दाम दे ला गार्ड’ बघण्यासाठी निघालो. मार्से मधेच एका छोट्या टेकडीवर हे चर्च आहे, तिथून सर्व मार्से दिसतं – पुण्यातल्या पर्वती सारखं! एका बाजूला निळाशार समुद्र, त्यामध्ये उभी असलेली पांढरी चुनखडकाची (लाईमस्टोन) छोटी बेटे, तर विरुद्ध बाजूला उंच डोंगररांगा, आणि या दोन्हीच्या मध्ये वसलेलं मार्से शहर… हा देखावा चुकवू नका असं अनेकांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही ते चर्च पाहायला गेलो. चर्च देखील मी आत्तापर्यंत युरोप मध्ये पाहिलेल्या चर्चेस पेक्षा वेगळ होतं. बांधकाम आणि कलाकुसरीच्या बाबतीत मध्यपूर्वेतील स्थापत्याचा प्रभाव होता. इस्तंबूल, दमास्कस, समरकंद येथील मशिदींवर ज्याप्रमाणे सोनेरी वर्खात नक्षीकाम केलेलं असतं, तसेच इथे भिंतींवर सोनेरी मोर बनवले होते. शिवाय हे चर्च जागृत देवस्थान असावं असंदेखील आत बसल्यावर वाटून गेलं – का वाटलं हे सांगता येणार नाही, आणि तसं पण अशा गोष्टीना काही कारण देता येत नाही. ५-१० मिनिट शांततेत बसल्यावर बाहेर आलो. खाली मार्से शहर पसरलं होत. नैसर्गिक बंदरांना जो ‘C’ आकाराचा किनारा असतो, तसाच तो मार्से ला आहे हे वरून पाहताना समजत होतं. या ‘C’ च्या साधारण मध्यातून किनार्याकडे एक लांबलचक भिंत धावत होती – या भिंतीचा मार्से च्या बंदराला कंपाउंड सारखा उपयोग होत होता. भिंत सोडून जी थोडी जागा होती ती एखाद्या फाटकाप्रमाणे काम करत होती – त्यातून एका वेळी जास्तीत जास्ती २-३ जहाजे आतबाहेर करू शकली असती. एकूणच ही रचना जुन्या काळी बंदराच्या संरक्षणासाठी केली असावी. फाटकातून आत येणारी जहाजे ही ती भिंत आणि आतली किनारपट्टी यांच्या मधल्या जागेत ‘पार्क’ होत होती.

हा सगळा देखावा पाहण्यात बराच वेळ गेला, आणि एवढ्यात कुठूनसं एक भलं मोठ्ठ जहाज मार्से च्या त्या समुद्रात शिरलं. पण इतर जहाजांप्रमाणे ते फाटकातून आत आलं नाही, उलट भिंतीच्या बाहेरच्या बाजूलाच ते उभं राहिलं. ‘कदाचित तात्पुरतं थांबलं असेल’ – मी स्वत:शीच विचार केला. हा विचार मनात येत असतानाच, जसं छोट्या धाग्याला धरून ओढताना दुसऱ्या टोकाला काहीतरी मोठ्ठ, महत्वाचं हाती लागावं, तसच एक कल्पनाचित्र लख्खकन डोळ्यासमोर उभं राहिलं. ‘सावरकरांची बोट पण अशीच तात्पुरती बंदराबाहेर उभी असेल!’ सगळ्या गोष्टी जुळत होत्या – त्या घटनेचं छोटं मॉडेल बनवून समोर ठेवल्याप्रमाणे दिसत होत्या … ती बोट, त्याच्या जवळ असलेली बंदराची लांबलचक संरक्षक भिंत आणि आतल्या बाजूला मार्से चं बंदर!

प्रत्यक्ष घटना अशीच घडली असेल असं नाही. पण माझ्या मनातलं कुतूहल शमवण्यासाठी समोर उभा असलेला देवदत्त पट पुरेसा होता. मी मनातल्या मनात पाठीमागे उभ्या असलेल्या चर्चमधील देवतेचे आभार मानले, आणि परत आल्यावर याविषयी एक ब्लॉग-पोस्ट लिहायचं नक्की केलं :-).

marseilles-port

मार्से बंदर, संरक्षक भिंत आणि बंदराबाहेर नांगरलेले जहाज

Tags:


About the Author

God knows why but I have too many interests. So chances are that you and me have something in common. Let’s see… Patanjali? Chanakya? Romans? Vijaynagar? Shivaji? Renaissance? Vivekanand? Agatha Christie? Tagore? Hitchcock? S.D.Burman? Cary Grant? Satyajit Ray? Grace Kelly? Brucia la terra? Suchitra Sen? Roman Holiday? Vasantaro Deshpande? Robert de Niro? Malguena? Kishore Kumar? Osho? Hotel California? Smita Patil? Erich von Daniken? Pu La? GA? Andaz Apna Apna? Asha Bhosale? PVN Rao? … Watch this space, sooner or later you will something on similar topic5 Responses to मार्से आणि सावरकर

Your comment / आपली प्रतिक्रिया

Back to Top ↑