
लक्तरे आणि तोरणे
पावसाळ्यात ज्याप्रमाणे आपोआप कुत्र्याच्या छत्र्या (पक्षी मशरुम्स) उगवतात , तद्वतच संभाव्य वादाची कुणकुण लागली की बुद्धीजीवी, तत्वचिंतक, सुजाण नागरिक वगैरे आपसूकच जमा होतात. सध्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा ग पोरी पिंगा ..’ गाण्यावरून वादंग उठले आहे त्यासंदर्भात भन्साळीना मराठीसंस्कृती इ विषयी समज देण्याचे काम अशा जागरूक नागरिकांनी आपल्या शिरावर घेतले आहे. काहींनी तर सरकारदरबारी आपला गाऱ्हाणं मांडलं आहे.
कुणाचं म्हणणे पेशव्यांची पत्नी – काशीबाई – वाड्यात असं खुलेआम नाचेल गाईल काय… ते पण मस्तानी बरोबर…. मुद्दा रास्त आहे. पण हा इतिहासाचा विपर्यास आहे काय? मग पूर्वीच्या संगीत नाटकातून ययाती, देवयानी, कच, सुभद्रा, बलराम इत्यादी लोक बोलता बोलता गायला सुरु करायचे हा पण इतिहासाचा विपर्यास म्हणायचा काय? का कलेच स्वातंत्र्य? दिग्दर्शक हे काही इतिहासकार नव्हेत – जस्सच्या तस्स सगळं दाखवायला… तीन तासांत संपूर्ण बाजीराव उभा करण्यासाठी ते कथेत थोडेफार फेरबदल करणारच… शिवाय धंद्याचं पण गणित आहे… निव्वळ तत्वाचा प्रश्न नाहीये.
अर्थात आपल्याला कुठल्याही गोष्टीला तत्वाचा प्रश्न बनवायला आवडतं .. पण इथे तेवढा देखील अधिकार आपल्याला राहिला आहे का हा प्रामाणिक प्रश्न आहे. भन्साळी नी देवदास बनवला होता, तेंव्हा त्या मध्ये देखील पारो आणि चंद्रमुखी गळ्यात गळा घालून नाचल्या होत्या… जे मुख्य कादंबरीला धरून नव्हत. बंगाली लोक भन्साळीच्या देवदासला सर्वाधिक नाके मुरडतात. पण इथे वस्तुस्थिती ही पण आहे की , हिंदी मध्ये ही देवदास ची तिसरी रेमेक होती, शिवाय मूळ बंगाली मध्ये एक-दोन रेमेक्स आहेत त्या वेगळ्याच. मराठी मध्ये (हिंदी तर दूर राहो) आजपर्यंत किती बाजीराव झाले? देवदास तर काल्पनिक पात्र आहे, बाजीराव ही वास्तविक व्यक्तिरेखा आहे .. तीदेखील इतिहासात अजोड! मग आज मराठी माणसाने बाजीरावाच्या खात्यावर काय काय जमा केली आहे? एखादं सीझर सारखं नाटक? मुगले -आझम सारखा चित्रपट? एक ‘राऊ’ नावाची कादंबरी… राजा केळकर वस्तुसंग्रहालयातील चार भांडी अन कपडे … रावरखेडी नावाच्या कुण्या अज्ञात गावात तग धरून राहिलेली अज्ञात समाधी .. हा आपला बाजीरावांना मानाचा मुजरा आहे! वर्तमानात बाजीरावांचा उपयोग काय तर … “स्वतःला मोठा बाजीराव समजतो” अशा तद्दन हेटाळणीच्या कामापुरता! आज नवीन पिढीमध्ये – शाळेत आणि शाळेबाहेर – किती जणांना बाजीराव माहिती असेल हा प्रश्नच आहे.
मग अशा सुपरहिरोना डावलून मुलांना Pogo वरचे सुपरहिरोज दाखवून, त्यांच्याकडून बरहुकूम “बाबा ब्लेकशीप” किंवा “रिंगा रिंगा रोजेस” पाठ करून घेऊन झाल्यावर मग आपण पिंगा, मराठी संस्कृती इत्यादीवर बोलायला मोकळे होतो. प्रेक्षक म्हणून चित्रपटाबद्दल नापसंती व्यक्त करायचा हक्क प्रत्येकाला निश्चितच आहे, पण नाण्याची दुसरी बाजू पण समजावून घेणे आवश्यक आहे… जबाबदारीची बाजू. मराठी दिग्दर्शकांनी जोधा-अकबर वगैरेंवर चित्रपट बनवले पण शिवाजी, संभाजी, बाजीराव अथवा पानिपत हे विषय त्यांना कधी पुरेसे नाट्यमय वाटले नाहीत. म्हणून बाजीरावांना महाराष्ट्राबाहेर – खरं तर पुण्याबाहेर – घेऊन जाणार्या भन्साळींचे आभार मानल्याविना चित्रपटातील छोट्यामोठ्या उणीवांवर बोट ठेवणे हा कद्रूपणा झाला. एरव्ही उपेक्षेत खितपत पडलेल्या बाजीरावांसाठी भन्साळींनी कसा का असेना पण एक भव्य दिव्य चित्रपट बनवला… याबद्दल मी नेहमीच त्यांचा आभारी राहीन
आपणच आपल्या संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली असताना इतर कोणी येऊन तिथे तोरणे बांधावी ही अपेक्षाच दुटप्पीपणाची, दांभिकपणाची आहे … आणि खरी शोकांतिका तिथे आहे.
Pingback: Allauddin Khilji, the Great (Posthumous) | Mindblogs ...Zero, Infinity and in between