पर्युत्सुक

Published on December 1st, 2016 | by Sandeep Patil

0

एका पात्राची अखेर

चित्रपट असो किंवा पुस्तक, पण त्या-त्या कथांमधील पात्रांविषयी मला नेहमीच आकर्षण वाटत राहिले आहे. चित्रपटांपेक्षा देखील पुस्तकातील पात्रांचे अधिक! चित्रपटामधील पात्रांना एक चौकट असते, एक जिवंत हाडामांसाचा अभिनेता ती भूमिका साकारत असतो, प्रेक्षक म्हणून आपली कल्पना त्या चौकटीपलीकडे जाऊ शकत नाही. या उलट पुस्तकांचे, तिथे स्वत:च्या कल्पनाशक्तीला आणि अन्वयार्थ (interpretation) लावायला पूर्ण वाव असतो. उद्या जर शंभर चित्रकारांना पुलंचा नारायण काढायला लावला तर शंभर वेगवेगळी चित्रे दिसतील, मात्र गब्बरसिंग सगळ्यांचा सारखाच येईल!

म्हणूनच की काय, पण कथानकापेक्षा पात्रांवर भर देणारी पुस्तके – जशी “व्यक्ती आणि वल्ली”, “माणसे: अरभाट आणि चिल्लर”, “स्वामी” किंवा “दुनियादारी” – यासारखी पुस्तके परत परत वाचायचा कंटाळा येत नाही. भोवतालच्या लोकांमधले मनुष्यस्वभावाचे रंग ओळखणे हे तसे दुरापस्त काम, पण दर्जेदार पुस्तकांमधून हेच रंग अधिक उठावदार होतात… आणि अशी पात्रे देखील वाचकांच्या मनात कायमची घर करून बसतात.  “असा मी असा मी” मधले धोंडोपंत आणि शंकऱ्या, “व्यक्ती आणि वल्ली” मधले हरितात्या, अंतू-बर्वा, सखाराम गटणे, पुलंचाच घर बांधताना जागोजागी ‘मज्जा’ करणारा कुळकर्णी, प्र. ना. संतांचे लंपन आणि सुमी, फास्टर फेणे आणि गोट्या, “पानिपत” मधला कावेबाज नजीब, खांडेकर-सावतांचे ययाती-कच-अश्वत्थामा-कर्ण  …. या सगळ्या पात्रांचा आपण कळत-नकळत जिवंत लोकांप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात उल्लेख करत असतो. कित्येकदा ती केवळ कल्पनेच्या जगात अस्तित्वात आहेत याचेच विस्मरण होते. पुलंनी “व्यक्ती आणि वल्ली” च्या प्रस्तावनेत म्हंटले आहे की “…. या व्यक्तिरेखा जर कधीकाळी जिवंत झाल्या तर मी त्यांना कडकडून भेटेन”. पण पात्रे शेवटी पात्रेच राहतात हेच खरे! अर्थात या नियमाला एक अपवाद योगायोगाने माझ्या बाबतीत घडला होता… पुस्तकातील एक पात्र मूर्त स्वरुपात पाहायचा योग मला आला होता… पण बघता बघता ही वास्तवातील व्यक्तिरेखा पुन्हा एकदा अमूर्तात विरून गेली!

शाळेत १० वी इयत्तेत असताना ‘बालभारती’ ने मराठी पुस्तकात काही अत्यंत सुंदर गद्य-पद्याचा अंतर्भाव केला होता… एवढा की ते पाठ वाचूनच एखाद्याचं मराठी साहित्यावर प्रेम बसावं. त्यामध्येच ‘पाटी आणि पोळी’ नावाची एक कायम आठवणीत ठेवावी अशी गोष्ट होती. “झोंबी” नावाच्या एका पुस्तकातून हा उतारा घेतला आहे हेदेखील समजले. ( त्याकाळी प्रत्येक धड्याच्या शेवटी संदर्भासाठी मूळ पुस्तकाचे नाव देण्याचे सौजन्य शिक्षणमंडळ दाखवत असे ) पुढे वर्षभरातच योगायोगाने ते पुस्तक माझ्या मावशीच्या घरी मला दिसले आणि मी त्यावर डल्ला मारला. पुस्तक वाचल्यावर मला ते एवढे आवडले की ते मी पुढे कधी तिला परत केलेच नाही (ती माझा ब्लॉग वाचणार नाही याची खात्री आहे… त्यामुळे काळजीचे कारण नाही) “झोंबी” मी आजतागायत दहाहून अधिक वेळा सहज वाचले असेल!jhombi_anand_yadav

ज्यांना ‘झोंबी’ माहित नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचे झाले तर, “झोंबी ही एका लहान मुलाने आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या जीवापाड मेहनतीची, काबाडकष्टांची आणि न संपणाऱ्या दु:खांची कहाणी आहे… नुसती कहाणी नव्हे, तर शतप्रतिशत सत्यकथा आहे. ज्याने हे भोग भोगले आणि त्यातून जो तगला, तो पुस्तकाचा नायकही आहे आणि लेखकही!”  दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे आत्मचरित्र आहे. ‘झोंबी’ हे एक दर्जेदार आत्मचरित्र का आहे याचं विश्लेषण स्वत: पुलंनीच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलं आहे. एरव्ही ‘आत्मचरित्र’ म्हंटल की त्याच्याशी निगडीत काही कल्पना घट्ट जमलेल्या असतात. ४२ च्या चळवळीत कारावास भोगला असेल किंवा गेलाबाजार एखाद्या कंपनी चे सी.इ.ओ. पद भूषविले असेल तरच आत्मचरित्र लिहू लागावे , एरव्ही हे येरागबाळ्याचे काम नाही असा एक सर्वसाधारण समज आहे. पण कुणाच्या आयुष्यातला पहिली ते मेट्रीक एवढासाच प्रवास देखील पराकोटीचा नाट्यमय आणि अविश्वसनीय असू शकतो! आयुष्यात नाट्यमय गोष्टी घडण्यासाठी मोठी क्रांती केली पाहिजे किंवा मोर्चामध्ये पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या पाहिजेत असेच नाही …. आपल्या आईला, एका ओल्या बाळंतीणीलाआपला बाप छुल्लक कारणावरून बाळंतीणीच्या बाजल्यावरच गुरासारखा मारतो किंवा आपला संबंध तालुक्यात पहिला नंबर आला आहे, त्यासाठी पेपरात आपले नाव छापून आले आहे पण घरात सगळेच निरक्षर, त्यामुळे हा आनंद कुणाबरोबर वाटता येत नाही आणि घरात कुणाला त्याची किंमत समजत नाही, शेवटी बक्षीस म्हणून त्याला दोन पेढे खरेदी करायला मिळतात आणि त्यापैकी एक चरफडत देवापाशी ठेवावा लागतो … एवढे भीषण दारिद्र्य, अडाणीपणा आणि निराशाजनक वातावरण… आणि त्याबरोबर केलेलं Struggle (यालाच ग्रामीण मराठीत ‘झोंबी’ म्हणतात), या गोष्टीदेखील तेवढ्याच नाट्यमय आहेत. ‘झोंबी’ ने कायमचं मनात घर केलं!

‘झोंबी’ एवढे दु:खानी भरलेले पुस्तक असूनदेखील ते खाली ठेवले जात नाही, मात्र त्याचा शेवट सकारात्मक आहे. त्यामुळे कथेच्या नायकाचे – म्हणजे ‘आनंद’ किंवा ‘आंदू’ चे – पुढे काय होते याची एक उत्सुकता होतीच. नंतर कधीतरी समजले की डॉ. आनंद यादवांनी आपल्या आत्मचरित्राचे पुढील दोन भाग ‘नांगरणी’ आणि ‘घरभिंती’ प्रकाशित केल्या आहेत (तेंव्हा अजून ‘काचवेल’ प्रकाशित झाली नव्हती). ‘नांगरणी’ कुठूनतरी लायब्ररी मधून मिळवून वाचलं आणि पुढे ‘घरभिंती’ साक्षात डॉ आनंद यादवांकडूनच वाचायला मिळाले!!!! मराठी पुस्तकांचा चाहता वाचक म्हणून माझ्यापाशी कायम जतन कराव्याश्या ज्या २-४ आठवणी आहेत त्यापैकी ही एक!

त्याचं असं झालं की मी इंजीनिअरिंग साठी पुण्याला आलो आणि डॉ यादव राहत होते त्याच कॉलनीमध्ये राहू लागलो.  माझा एक मित्र डॉ यादवांच्या घरासमोरच राहत असे त्याच्या घराच्या कट्ट्यावर बसून रोज संध्याकाळी आमचं खिदळणं सुरु असे. तेंव्हा कधी कधी समोरच्या अंगणात पांढऱ्या शुभ्र मागे वळवलेल्या केसांची, डोळ्याला चष्मा घालणारी आणि मुख्य म्हणजे एवढ्या दुरून देखील एक प्रकारचा दरारा जाणवणारी डॉ. यादवांची मूर्ती संथपणे इकडून तिकडे जाताना दिसत असे. पुढे पुढे त्यांचा मुलगाच माझा चांगला मित्र झाला आणि माझं त्यांच्या घरी येणंजाण सुरु झालं. अर्थात घरी गेलो तरी त्याचं ओझरत दर्शनच होत असे आणि मी देखील अशा वेळी कमालीचा नर्व्हस असे. त्यामुळे एरव्ही आगाऊपणा करून आपण एखाद्याशी (किंवा एखादीशी) संभाषण वाढवतो तसा प्रकार कधी झाला नाही. एकदा धीर करून त्यांच्या कडे घरभिंती वाचायला मागितलं हीच माझ्या शौर्याची परिसीमा झाली. एरव्ही इतक्यांदा त्यांच्या कडे जाऊन देखील, माझ्याकडे असलेल्या, असंख्य पारायणे झालेल्या “झोंबी” च्या प्रतीवर त्यांची स्वाक्षरी घ्यावी एवढी साधी गोष्ट देखील मला तेंव्हा कधी सुचली नाही. असो! एकदा “आशुतोष आहे काय” विचारत घरी गेलो होतो तेंव्हा त्यांनी दार उघडलं आणि म्हणाले “तो बाहेर गेलाय, परत आला की तुझ्याकडं ‘लावून’ देतो”. ‘लावून देणे’ हा खास कोल्हापुरी शब्द, म्हणजे पाठवून देणे. त्यांच्या बोलण्यातून लख्खकन वीज चमकून जावी तसा जुना, ओळखीतला कोल्हापुरी शब्द येऊन गेला आणि मला एकदम ‘आंदू’ ची खुण पटल्यासारखी झाली. मात्र त्यापलीकडे त्यांच्या सध्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि माझ्या गोष्टीतील पात्राचा मेळ बसला नाही… ते शक्यही नव्हतं, डॉ आनंद यादव आणि ‘आंदू’ मध्ये चांगली चाळीसेक वर्षांची दरी ऐसपैस पसरली होती.

पुढे पुणे सुटलं… मधली वर्षे निघून गेली. माझ्याकडची ‘झोंबी’ देखील कुठेतरी गायब झाली. ‘नटरंग’, ‘तुकाराम’ या निमित्ताने त्यांच्याविषयी अधेमध्ये वाचायला मिळे… कधी पुण्यातल्या जुन्या मित्राकडून थोडीफार वार्ता समजे. त्यानंतर गेल्या अनेक दिवसानंतर बातमी आली ती थेट त्यांच्या निधानाचीच. गेले दोन दिवस काही विशेष कारण नसताना देखील सगळ्या कामात एक प्रकारचा खिन्नपणा जाणवत होता आणि त्यामागचं कारण समजत नव्हतं. मग, एकाएकी उलगडा झाला…  जशी फास्टर फेणे, लंपन किंवा वाडेकरांचा ‘चिंटू’ ही सगळी प्रातिनिधिक पात्रे आहेत; पण म्हणूनच त्यांना मृत्यू देखील नाही… किंबहुना त्याचं वय देखील स्थिर आहे!  आपण त्यांना जरी काल्पनिक पात्रे म्हणत असलो तरीही कल्पनेतदेखील आपण त्यांच्या मृत्यूचा विचार करू शकत नाही. पण ‘आंदू’ मात्र एका विचित्र परिस्थितीच्या कचाट्यात अडकला होता… कल्पनामय जगतातील पात्रांप्रमाणे तो एकीकडे चिरतरुण राहिला, पण त्याच वेळी वास्तविक जगातील कोणा व्यक्तीशी बांधील राहणे देखील त्याच्या माथी आले. म्हणून जेंव्हा डॉ यादव गेले तेंव्हा त्यांच्याच बरोबरीने आतापावेतो जिवंत राहिलेल्या ‘आंदू’ला ही मृत म्हणून स्वीकारणे प्राप्त झाले. एका आवडत्या पात्राची ही अशी अचानक झालेली अखेर मला राहून राहून सतावत होती.  नियती कधी कधी कल्पनेतल्या जगातदेखील सुखाने राहू देत नाही!

 

चित्र सौजन्य: www.aksharnama.com

Tags:


About the Author

God knows why but I have too many interests. So chances are that you and me have something in common. Let’s see… Patanjali? Chanakya? Romans? Vijaynagar? Shivaji? Renaissance? Vivekanand? Agatha Christie? Tagore? Hitchcock? S.D.Burman? Cary Grant? Satyajit Ray? Grace Kelly? Brucia la terra? Suchitra Sen? Roman Holiday? Vasantaro Deshpande? Robert de Niro? Malguena? Kishore Kumar? Osho? Hotel California? Smita Patil? Erich von Daniken? Pu La? GA? Andaz Apna Apna? Asha Bhosale? PVN Rao? … Watch this space, sooner or later you will something on similar topic



Your comment / आपली प्रतिक्रिया

Back to Top ↑