पर्युत्सुक

Published on January 6th, 2017 | by Sandeep Patil

3

छत्रपती संभाजी – बदलती चित्रे

सुदैवाने आणि दुर्दैवाने, इतिहास हा विज्ञानासारखाच संशोधनाचा विषय आहे.  सुदैवाने अशासाठी की संशोधन कधी संपत नाही. नवीन संशोधक येतात, नवीन माहिती-पुरावे येतात, संदर्भ बदलतात … त्यामुळे विषय तोच राहिला तरी एक संशोधक जातो, त्याजागी नव्या दमाचा, नव्या विचारांचा संशोधक येतो, नवे सिद्धांत येतात आणि संशोधन चालू राहते. दुर्दैवाने अशासाठी कारण विज्ञानाचा संबंध पदार्थांशी येतो, त्यामुळे वैज्ञानिक संशोधन वस्तुनिष्ठ राहू शकते. आईनस्टाईन च्या सापेक्षता सिद्धातानी न्यूटन च्या गतिविषयक समीकरणाच्या मर्यादा दाखवून दिल्या; म्हणून न्यूटन समर्थकांनी चिडून जावून आईनस्टाईन च्या घराबाहेर निदर्शने केली वगैरे प्रकार विज्ञानाच्या कार्यक्षेत्रात होत नाहीत. जुना सिद्धांत चुकला किंवा अपूर्ण राहिला, त्याजागी  नवीन सिद्धांत आला हे विज्ञानात आपण गृहीतच धरत असतो. मात्र इतिहासाचा संबंध व्यक्तींशी, व्यक्तीनिगडीत भावनांशी आणि त्याहून वाईट म्हणजे राजकारणाशी असल्यामुळे इतिहास संशोधनातील चढ-उतार कधी कधी जास्त महागात पडू शकतात. छ संभाजी महाराज हे एकीकडे ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणून अशा चुकीच्या संशोधनाला बळी पडले आणि कै राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून दुसरया बाजूने याच संशोधानापायी काही आधुनिक शूर मावळ्यांच्या तुघलकी पराक्रमाचे लक्ष्य झाले.  ज्या नाटकासाठी गडकऱ्यांच्या प्रतिमेची विटंबना झाली त्या नाटकाला आता जवळपास १०० वर्षे झाली!  इतिहास संशोधन या प्रकारालाही सुमारे तेवढीच वर्षे झाली. या काळात संभाजी या विषयावरील संशोधनात कसे आणि का बदल घडले, जुने समज-गैरसमज कसे दूर झाले, याचा हा थोडक्यात आढावा.

महाराष्ट्रात इतिहास संशोधन या प्रकाराची सुरुवात साधारण शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी… म्हणजेच शिवाजी/संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर जवळपास तीनशे वर्षांनी झाली. या मधल्या तीनशे वर्षात थोडेफार लेखन हे बखरींच्या स्वरुपात झालं आहे. पण ते इतिहास लेखन आहे, इतिहास संशोधन नव्हे! या बखरीपैकी सर्वात पहिली (शिवचरित्रावरील) बखर – सभासदाची बखर – ही इ.स. १६९७मध्ये – म्हणजेच छ. संभाजींच्या मृत्युनंतर ८ वर्षांनी लिहायला सुरु झाली. इतर बखरी तर उत्तर पेशवाई काळातील, म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १०० वर्षानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत, म्हणजे या बखरी लिहिल्या तेंव्हा शिवाजी किंवा संभाजी पाहिलेले कोणी लोक देखील हयात नव्हते.  अपवाद अर्थातच सभासद बखरीचा… ही बखर लिहिणारा कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांच्या दरबारातील अधिकारी होता. पण तरीदेखील सभासदाच्या बखरीत विशेषकरून घटनाक्रमाचे बरेच घोळ आहेत. याशिवाय शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत तयार केलेली साधने म्हणजे जेधे शकावली ( याला एक प्रकारची डायरी म्हणू शकतो) आणि शिवरायांचा समकालीन (आणि बहुधा महाराजांचा विश्वासू ) कवींद्र परमानंद रचित संस्कृत काव्य ‘शिवभारत’. या शिवाय मग मोघलांनी “त्यांच्या बाजूने” लिहिलेली फारसी साधने आहेत आणि इंग्रज-पोर्तुगीज-डच लोकांचे पत्रव्यवहार आहेत.  

थोडक्यात शिवाजी/संभाजी च्या ३०० वर्षे पश्चात एवढ्या मोडक्या-तोडक्या, तुटपुंज्या माहितीच्या आधारावर इतिहास संशोधनाला सुरुवात झाली तेंव्हा त्या माहितीचे  स्वरूप  Too late, too little असेच होते.  शिवाय हे ठिपके जोडताना आधुनिक इतिहासकारांचे गैरसमज होणे स्वाभाविक होते, पण मघाशी म्हणल्याप्रमाणे त्याला अधिक बळी पडले ते छ. संभाजी. त्याचे कारण म्हणजे संभाजीचरित्रातील परस्परविरोधी घटना, कच्चे दुवे आणि भरीत भर म्हणजे बखरकारांनी घातलेला गोंधळ.  पण या घटनांकडे थेट न जाता, पहिले संभाजीची बालपणापासूनची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.

माझ्या दृष्टीने संभाजी समजून घेताना जी पहिली महत्वाची घटना आहे तेंव्हा संभाजी अवघा नऊ वर्षांचा होता… आपल्या वडिलांबरोबर हिदुन्स्तान च्या शहेनशहाच्या भेटीला तो आग्र्याला गेला होता. आग्र्याला भर दरबारात आपल्या वडिलांनी औरंगजेबाचा अपमान केला, दरबारात ते पाठ फिरवून बाहेर पडले आणि त्या नंतर हजारो मुघल सैन्याच्या गराड्यात ते कैद झाले या सगळ्या घटना त्याने स्वतच्या डोळ्यांनी पहिल्या, आपल्या परीने त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांनी सहकाऱ्यांबरोबर सुटकेचे बेत बनवले, त्या नुसार कल्पनेतही शक्य नाही अशी शत्रूच्या गराड्यातून सुटका त्यांनी करून घेतली. संभाजीला वाटेतच एका ब्राह्मणाच्या घरी ठेवून ते दक्षिणेच्या वाटेला लागले. शिवाजी महाराज राजगडावर पोहोचूल्यावर त्यांनी संभाजीच्या मृत्यूची खोटी बातमी जाहीर केली, त्याची खोटी उत्तरक्रिया करवली आणि उत्तरेतील त्याचा शोध थांबल्यावर त्याला आणायला लोक पाठवले.  या सगळ्या घटनांमध्ये शिवाजी महाराज हिरो आहेत, त्यामुळे नऊ वर्षाच्या संभाजीकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण वडिलांसोबत शत्रूच्या राजधानीतून बिनबोभाट बाहेर पडणे, शत्रूच्या मुलखात वेष पालटून दोन-अडीच महिने एकटेच राहणे आणि पुढे मोजक्या लोकांसोबत हजारेक किलोमीटर चा रस्ता लपत-छपत कापून स्वराज्यात दाखल होणे एवढ्या अचाट घटना या नऊ वर्षाच्या मुलाच्या नावावर आहेत!

 पुढे वर्षभरातच महाराजांचा प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेला मुघल छावणीत लहानग्या शंभूराजांना जावे लागले, तिथेच दोनेक वर्षे राहावे लागले. तेंव्हा सोबतीला सेनापती प्रतापराव गुजरंसारखे अनुभवी लोक दिले होते. मुघल छावणीत त्यांनी मुघल शहजाद्याशी इथवर संधान बांधलं की पुढे “बादशहाने तुम्हाला कैद करण्याचे फर्मान पाठवले आहे”, हा संदेश प्रतापरावांना साक्षात शहजाद्याने दिला आणि त्यांना  छावणीतून सुखरूप पळून जाऊ दिले!  थोडक्यात शत्रूच्या गोटात सावधगिरी ने राहणे, गुप्तता राखणे, धूर्तपणे वागणे या सगळ्याचे धडे पुरेपूर संभाजीला लहान वयापासून पुरेपूर मिळत गेले. राजकारणाचे पाठ परिस्थिती जेवढी चांगली शिकवते तेवढे इतर कुठून शिकता येत नाहीत. इथून पुढे ६-७ वर्षे, म्हणजे राज्याभिषेकापर्यंत सर्वकाही आलबेल आहे. एका गुणी, जबाबदार युवराजाचे सर्व गुण शम्भूराजांमध्ये दिसतात, जोडीला काव्य-शास्त्र-कलेची आवडही आहे. ही पार्श्वभूमी देण्याचे कारण म्हणजे, नंतरच्या काळातील घटना या अपुऱ्या माहितीच्या, वादग्रस्त आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यांचा विचार करताना ज्या घटना वादातीत आहेत त्यांचा संदर्भ असणे महत्वाचे आहे. शिवराज्याभिषेकानंतर काही खुलासा न देता येण्यासारख्या घटना सुरु होतात.

पहिली म्हणजे युवराज आणि मंत्रीमंडळ यांच्यातील मतभेद. या मतभेदांचे कारण निश्चितपणे कुठेही दिलेले नाही… आणि अंदाज करायलाही काही वाव नाही. एकीकडे मंत्रिमंडळात मोरोपंत पिंगळेसारखे अफझलखान प्रकरणापासून मोलाची कामगिरी बजावत आलेले ज्येष्ठ मंत्री आहेत आणि दुसरीकडे युवराज म्हणून संभाजीराजांची कामगिरीदेखील चांगली आहे. पण तरीदेखील मतभेद होते आणि ते चालूच राहिले. यानंतर महाराज दोन वर्षे दक्षिणेत होते मात्र त्यांच्या मागे संभाजीराजांना युवराज म्हणून कारभार पाहायचा अधिकार मिळाला नाही. महाराज परत आल्यावर  देखील, बहुधा या वादाचा तोडगा मनाविरुद्ध गेल्यामुळे, संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले! मला वाटतंय या मुद्द्यावर युवराज मुघलांना मिळाल्यामुळे बहुतेक बखरकारांची – आणि म्हणून इतिहास संशोधकांची – सहानुभूतीही मंत्रिमंडळाच्या बाजूने जाते.  शिवाय मदतीला, याच काळातील “संभाजीचे कुण्या विवाहित स्त्री शी संबंध आहेत” आणि ही स्त्री मंत्रिमंडळातील मोरोपंत किंवा अनाजी दत्तोंची मुलगी/सून होती किंवा थोरात नामक सरदारांची मुलगी होती अशा स्वरूपाच्या बातम्या मिळतात . या बातम्या फारश्या विश्वसनीय आहेत असे नव्हे, शिवाय त्या मुख्यत्वे परदेशी साधनातून आणि फारसी साधनातून आल्या आहेत, मराठी नव्हे. पण त्यांना गरजेपेक्षा जास्ती महत्व व प्रसिद्धी मिळण्यामागे दोन महत्वाचे घटक आहेत … पहिले हे की मुलत: मंत्रिमंडळ आणि संभाजी यांच्यामध्ये वाद असण्याची निश्चित किंवा समाधानकारक कारणे ज्ञात नाहीत, दुसरे म्हणजे अविचाराने म्हणा, उद्विग्न होऊन म्हणा पण संभाजीराजे थेट मुघलांना जाऊन मिळाले… मराठ्यांचा युवराज मुघलांना मिळाला ही अभूतपूर्व अशी घटना होती, त्यामुळे त्याच्या पुढे-मागे घडलेल्या घटनांना देखील अधिक महत्व प्राप्त झाले.

हा पहिला प्रसंग, ज्याने संभाजीराजांच्या प्रतिमेवर अविचारी, भावनाप्रधान, रंगेल इत्यादी रंग चढवले…. या नंतर या राजाच्या पुढच्या दहा वर्षातील अल्पायुष्यात असे अनेक अस्पष्ट, अतर्क्य, परस्परविरोधी प्रसंग येत गेले जिथे साधारण “बेनेफिट ऑफ डाऊट” पद्धतीने हे रंग पक्के होतच गेले. याच मालिकेतील शेवटचा प्रसंग… जो दुर्दैवाने या राजाच्या आयुष्यातील सुद्धा शेवटचा प्रसंग आहे, तो देखील तेवढाच कल्पनातीत आहे. एव्हाना औरंगझेबाशी युद्ध सुरु होऊन सात-आठ वर्षे लोटली होती आणि औरंगझेबाला म्हणावे तसे यश प्राप्त झाले नव्हते. मात्र शेवटी शेवटी मराठी राज्यात फंदफितुरी ला चालना देण्यात औरंगझेब यशस्वी झाला – यात तसा पण औरंगझेबाचा हातखंडा होता! खेळणा (म्हणजे विशालगड) वर अशाच एका फितुरीचा बंदोबस्त करून रायगडावर परत येत असताना कोकणात संगमेश्वर जवळ संभाजीराजे मुक्काम करून होते. ही बातमी राजांच्या मेहुण्याने, म्हणजे गणोजी शिर्क्याने मुघलांना दिली!!!!  मोगल सैन्याची धाड पडली आणि त्यांनी राजांना कैद करून धरून नेले. या प्रसंगात काही आजवर उत्तर न मिळालेले प्रश्न आहेत. संगमेश्वर हे मराठा राज्याच्या हद्दीत आतपर्यंत होते, मोगली सैन्य जवळपास ३ दिवसाची दौड मारून मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या पन्हाळगडाच्या  पायथ्या जवळून मराठी मुलखात घुसले आणि पुन्हा २ दिवसांच्या दौडीनंतर कराडला आपल्या छावणीवर पोहोचले. एवढ्या आतपर्यंत सैन्य घुसुपर्यंत मराठे गाफील कसे राहिले, राजांना पकडल्यावर देखील आजूबाजूच्या परिसरातील कुठल्याच सैन्याने या मुघल सैन्यावर किंवा छावणीवर हल्ला केल्याचे उल्लेख नाहीत. (बत्तीस शिराळा भागात  संभाजीराजांचा विश्वासू जोत्याजी केसरकर ने आपल्या तुकडीसह सुटकेचा अयशस्वी प्रयत्न केला अशा लोककथा आहेत) (१) . या प्रकरणात संभाजीराजे शत्रूने पूर्ण संगमेश्वराची नाकेबंदी करुपर्यंत कसे गाफील राहिले हा कळीचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आधीच असलेली समजूत … “संभाजी विलासी, रंगेल होता, बेसावध होता” … ही कामी आली. ( शिवाय फारसी साधनांमध्ये असेच उल्लेख आहेत – पण त्यात विशेष आश्चर्य वाटण्याचे कारण नाही). या प्रश्नाची उत्तरे आज देखील समाधानकारक मिळालेली नाहीत. मात्र मधल्या तीनशे वर्षात कवी कलश नामक एका कनोजी ब्राह्मणाच्या आहारी जाऊन संभाजी हे सगळे करतो यासारख्या कथांना अधिक चालना मिळाली. बखरींमध्ये देखील “कवी कलशाच्या बोले (सांगण्यावरून)…” अशी वाक्ये वरचेवर आहेत. ज्या शिर्क्यांनी संभाजीराजांना दगा देवून मुघलांच्या जाळ्यात अडकवले, त्या शिर्क्यांशी कवी कलशाची नुकतीच लढाई झाली होती. कलशा विषयी आणि “त्याच्या आहारी गेलेल्या संभाजी विषयी” अपप्रचार निर्माण होण्यात त्यांच्या मागे राहिलेल्या हितशत्रूंचा संबंध आहे. कै. नरहर कुरुंदकरांनी दिलेल्या माहितीनुसार “संभाजीच्या गैरवर्तनाचा पहिला उल्लेख १६९० चा आहे” (म्हणजे संभाजीराजांच्या मृत्युनंतर एका वर्षांनी). तसेच पुढे पेशवेकाळात लिहिल्या गेलेल्या बखरीपैकी चिटणीशी बखर हि संभाजीराजाविरुद्ध आकसाने लिहिली होती असे मानण्यास पुरेशी जागा आहे (२) . अपुरी माहिती , अपप्रचार आणि मध्ये ३०० वर्षांची दरी या सगळ्यानंतर संभाजी महाराजांविषयी जे इतिहास संशोधन सुरु झाले त्याला ही अशी पार्श्वभूमी आहे.

हे संभाजी महाराजांविषयीचे चित्र दुर्दैवाने इतिहास्कारांच्यात बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाच्या सर्वच साहित्यकृती या गैरसमजाला बळी पडलेल्या आहेत. केवळ गडकऱ्यांच्या अपुऱ्या नाटकातील संभाजी नव्हे … तर रणजीत देसाईंचा संभाजी, शिवाजी सावंतांचा संभाजी हे सगळे देखील कमी अधिक फरकाने याच चालीचे आहेत. संभाजीराजांचे हे गैरसमज पहिल्यांदा दूर केले आणि राजांचे एक मुत्सद्दी, जबाबदार, धोरणी, धूर्त पण धाडसी असा संभाजी हे रूप पहिल्यांदा लोकांसमोर आणले ते इतिहास संशोधक कै. वा. सी. बेंद्रे यांनी अंदाजे १९६० मध्ये (३ ). ती भूमिका पुढे सेतुमाधवराव पगडी सारख्या संशोधकाने उचलून धरली. मधल्या काळात संगमेश्वर येथे कैद झाली तेंव्हा छ. संभाजी महाराज अर्जोजी आणि गिरीजोजी यादव या भावातील निवाड्याचा निकाल देण्यासाठी थांबले होते याचे अस्सल कागदपत्र सापडले आणि संभाजी विलासासाठी संगमेश्वरी कलशाच्या वाड्यावर थांबला होता हा विचार पूर्णपणे कोलमडून पडला. त्यामुळे अलीकडच्या काळात आलेल्या  विश्वास पाटलांच्या ‘संभाजी’ सारख्या पुस्तकातून संभाजीच्या व्यक्तिरेखेवर झालेले अन्याय बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहेत.

काळाच्या ओघात उरलेली काजळी निघून जावून या राजाला भारताच्या इतिहासात तोलामोलाचे स्थान मिळो हीच इच्छा!

संदर्भ –
१. मराठेशाहीचे अंतरंग – डॉ. जयसिंगराव पवार
२. संभाजी – उपसंहार – विश्वास पाटील
३. बेन्द्र्यांचा संभाजी – मागोवा – नरहर कुरुंदकर

Tags: ,


About the Author

God knows why but I have too many interests. So chances are that you and me have something in common. Let’s see… Patanjali? Chanakya? Romans? Vijaynagar? Shivaji? Renaissance? Vivekanand? Agatha Christie? Tagore? Hitchcock? S.D.Burman? Cary Grant? Satyajit Ray? Grace Kelly? Brucia la terra? Suchitra Sen? Roman Holiday? Vasantaro Deshpande? Robert de Niro? Malguena? Kishore Kumar? Osho? Hotel California? Smita Patil? Erich von Daniken? Pu La? GA? Andaz Apna Apna? Asha Bhosale? PVN Rao? … Watch this space, sooner or later you will something on similar topic3 Responses to छत्रपती संभाजी – बदलती चित्रे

 1. Prajwal patil says:

  Punjal nahi Punal

 2. Prajwal patil says:

  Jotiyaji keserkar Punal Che aage

 3. Rajesh Patil says:

  Dear Sandeep,

  Here is the issue, not only you but a huge set of Modern day non Tughlaki intellectuals read some novels and consider it as history. Our government is also so intelligent and un biased that they erect a gadakari statue in Ch.Sambhaji Garden!!!!. None of the intellect has any issue its those illiterate Tughalks who find some issue with this. And when these Tughlaki Modern day Mavale go to the government with request to remove and re install this statue elsewhere and wait for 10 years before going for an action (Tughlaki) all intellectuals start feeling the pain.

  I can give only one advise to you and all intellectuals that Read History through books and not through the novels/plays/movies. These are good for entertainment.

  Why do you think a modern day novelist Vishwas Patil could give more justification than other writers? is it something to do with his study of history?

  How about a statue of Dr.Ambedkar in a garden named after Ram, Laxman or Seeta?

  Or a family statue of Mahavira ,Princess Yasoda ,Anojja /Priyadarsan in a garden in Digambar jain Garden/ Pilgrimage?

  Or OSHO statue in Bramhakumari Ashram?

  Or a statue of Zakir Naik in RSS headquarter?

  Or statue of Ram Gadakri in Ch.Sambhaji Garden?

  I have no issue with the intellect of any of the above celebrities, however i will protest against any such mismatch , will wait for some time and then go for an action, if someone thinks its Tughlaki, they should wait and watch or discuss in social media.

  I strongly condemn the presence of Gadkari statue in Ch. Sambhaji Garden , if government wants they can erect it anywhere they wish. If they re install the statue , i will support anyone who is against it in any form, be it legal, Gandhian way of ahinsa or Netaji way of Action.

  I am in full support of the correction done by these youths.

Leave a Reply to Prajwal patil Cancel reply

Back to Top ↑